दत्तवाडीजवळ ट्रकची कारला धडक; अपघातात तीन ठार

Foto

वैजापूर:  मुंबई- नागपूर महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील दत्तवाडी येथे ट्रक व झायलो कार मध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर वैजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  जखमींना उपचारार्थ औरंगाबादमध्ये खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यातील एकाच आठवड्यात  हा दुसरा भीषण अपघात घडला आहे. आज सकाळी मुंबईहून औरंगाबादकडे येत असताना ट्रक आणि झायलो कार यांच्यात हा अपघात झाला. 

आमिर खान (वय 36 वर्षे), इर्शाद खान (वय 32 वर्षे) हारूण खान (वय 35 वर्षे) तिघे रा. बहिरंज, मुंबई) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर शादुल खान (वय 32 वर्षे), आयुब लाल खान (वय 36 वर्षे), नुरुद्दीन खान (वय 28 वर्षे) (सर्व रा. बहिरज, मुंबई) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मुंबई-नागपूर महामार्गावरील शिवराय कॉर्नरजवळ वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथून औरंगाबादकडे भंगार घेऊन येणार्‍या ट्रक (क्रमांक एमएच 15/बीजे 7858) व औरंगाबादकडून मुंबईकडे जाणार्‍या झायलो कार (क्रमांक एमएच 04/जीएम 6425) ची समोरासमोर धडक झाली.  हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकच्या धडकेने झायलो कारचा पार चुराडा झाला आहे. अपघातामुळे झायलो कार ही रस्त्याच्या कडेला जाऊन पडली.

तिन्ही मृतदेह गाडीमध्ये अडकले होते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गाडीचा पत्रा तोडून मृतदेह व जखमींना गाडी बाहेर काढले. अपघाताची माहिती वैजापूर पोलिस ठाण्यात कळताच जमादार थोरात व तमनार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखलिंना तात्काळ घाटी रुग्णालयात हलवले. अपघातामुळे मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ती पोलिसांनी सुरळीत केली. वैजापूर तालुक्यातील ही अपघाताची आठवड्यातील दुसरी मोठी घटना आहे. दोन दिवसापूर्वीच असाच भीषण अपघात घडला होता. त्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, या अपघातातदेखील तीन जण ठार झाले आहेत.